'मला ते बघवलं गेलं नाही आणि मी त्यांना पाणी दिलं, पण...'; चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:51 IST2025-04-09T12:50:36+5:302025-04-09T12:51:26+5:30
कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता, ज्यात एक व्यक्ती चित्त्यांना पाणी पाजताना दिसत आहे. त्याच व्यक्तीने यामागचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

'मला ते बघवलं गेलं नाही आणि मी त्यांना पाणी दिलं, पण...'; चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलं?
Kuno Cheetah:मध्य प्रदेशातील चित्त्यांना पाणी पाजण्याचं प्रकरण चांगलंच गाजलं. सावलीला बसलेल्या ज्वाला या मादी चित्त्यासह तिच्या बछड्यांना एका व्यक्तीने पाणी पाजलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं, पण वन विभागाने पुन्हा काही तासांत त्याला परत कामावर घेतलं. चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या या व्यक्तीचे नाव सत्यनारायण गुर्जर आहे. त्याने सगळा घटनाक्रम एका माध्यमांशी बोलताना सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सत्यनारायण गुर्जर याची गाडी वन विभागाने भाडेतत्त्वाने घेतलेली आहे. त्यामुळे तो वन विभागाच्या पथकासोबतच श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात गाडी चालक म्हणून काम करतो.
...म्हणून मी चित्त्यांना पाणी पाजलं
या घटनेबद्दल बोलताना सत्यनारायण गुर्जर म्हणाला, "जेव्हापासून चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आले, तेव्हापासून मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. माझी स्वतःची गाडी वन विभागाने गस्तीसाठी भाडेतत्त्वाने घेतली आहे. त्यादिवशी मी पथकासोबत होतो. चित्ते एका ठिकाणी बसलेले होते आणि ते तहानले असल्याचे दिसले. त्यामुळे मी परातीत पाणी ओतून त्यांना पाजलं."
सत्यनारायणने सांगितलं की, 'मला माहिती नव्हतं की, कुणीतरी पाठीमागून माझा व्हिडीओ बनवत आहे. जो नंतर व्हायरल झाला. त्यानंतर मला वन विभागाच्या संचालकांनी गाडीसह कामावरून काढून टाकले. पण, एका दिवसानंतर परत कामावर बोलवून घेतले. मी प्रशासनाचा आभारी आहे. माझी कोणतीही तक्रार नाही."
गावकऱ्यांनी केला सत्कार
"आमच्या कित्येक पिढ्या या जंगलात राहत आल्या आहेत. त्यामुळे मलाही जनावरांचा लळा आहे", असे सत्यनारायणने सांगितले. सत्यनारायण गुर्जरने चित्त्यांना पाणी पाजून चांगले काम केले. याबद्दल त्याचा ढेंगदा गावातील लोकांनी हार घालून आणि मिठाई खाऊ घालून सत्कार केला.
गुर्जर समाजाचे गावातील प्रमुख शंकर गुर्जर म्हणाले की, 'सत्यनारायणने चित्त्यांना पाणी पाजून चांगले काम केले, हे आम्हा सगळ्यांचा मान वाढवणारी बाब आहे.