मागच्या काही काळात फोन व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून लोकांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री मिथिलेश ठाकूर हे हनिट्रॅपची शिकार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मिथिलेश ठाकूर यांना बुधवारी एका फोन नंबरवरून वारंवार व्हिडीओ कॉल येत होते. व्हिडीओ कॉल आल्यानंतर मंत्रिमहोदयांनी त्यातील एक कॉल उचलला. व्हिडीओ कॉल उचलताच त्यांना अश्लील व्हिडीओ येऊ लागले. त्यानंतर त्यांनी फोन कट केला. त्यानंतर गुरुवारी मिथिलेश ठाकूर यांना या व्हिडीओ कॉलशी संबंधित असलेल्या लोकांनी फोनवरून धमक्या देण्यास सुरुवात केली.
तसेच काही लोकांना मिथिलेश ठाकूर यांना सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्यास धमकी देण्यास सुरुवात केली. याबाबत मिथिलेश ठाकूर यांनी सांगितले की, माझ्या मोबाईलवर एका नंबरवरून व्हिडीओ कॉल वारंवार येत होता. मी एकदा चुकून व्हिडीओ कॉल उचलला. त्यानंतर मी तो फोन त्वरित कट केला. त्यानंतर मला यासंदर्भात धमक्या येऊ लागल्या. आता मी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार कऱणार आहे. सध्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे हा विरोधी पक्षांचा कट असू शकतो. पोलिसांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी मिथिलेश ठाकूर यांनी केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झारखंडमधील गढवा जिल्ह्यात आलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मिथिलेश ठाकूर यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, आज सोनं महाग झालं आहे. मंत्री मिथिलेश ठाकूर हे पैशांच्या बाबतीत चटावलेले आहेत. ज्याप्रमाणे वाघाच्या तोंडाला रक्ताची चटक लागते, तशीच चटक मिथिलेश यांना लागली आहे. वाळूच्या प्रकरणातही मिथिलेश यांचा खिसा गरम होत असतो. झारखंडमध्ये पाण्यामध्येही त्यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे.