चंद्रयान ३ यशस्वी झाले आहे, परंतू चंद्रयान २ च्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. परंतू, चंद्रयान २ मिशन वाया गेलेले नाहीय. त्याचा ऑर्बिटर चंद्रयान ३ वर लक्ष ठेवून आहे. अंधाऱ्या भागात विक्रम लँडर आणि प्रज्ञान काय करतोय याची फोटोसह इत्यंभूत माहिती चंद्रयान २ चा ऑर्बिटर इस्रोला पाठवत आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या विक्रम लँडरचा रात्रीच्या वेळचा फोटो चंद्रयान २ ने पृथ्वीवर पाठविला आहे. चंद्रयान २ मिशन फेल झाले तरी हा ऑर्बिटर गेली चार वर्षे चंद्राच्या भोवती घिरट्या घालत आहे. चंद्रयान-2 च्या ऑर्बिटरमध्ये हाय-रिझोल्यूशन कॅमेरा आहे.
या कॅमेराद्वारे 23 ऑगस्टला विक्रम चंद्रावर उतरल्यानंतर फोटो काढण्यात आला होता. यानंतर ऑर्बिटरने विक्रम लँडरला मी तुला पाहिलेय, असा मेसेज पाठविला होता. चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे असल्याचे चित्रात स्पष्टपणे दिसत आहे. विक्रम लँडर हा सपाट भागावर उतरला आहे. ऑर्बिटरने 23 ऑगस्टच्या रात्री 10.17 वाजता हे छायाचित्र घेतले होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झालेले विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर यांचे कार्य नीट सुरू आहे. विक्रम लँडरमधील आयएलएसए, रंभा, सीएचएएसटीई या पेलोडनी गुरुवारी आपले काम सुरू केले. विक्रम लँडरच्या सोबत आलेल्या प्रग्यान रोव्हरने काही अंतर मूनवॉकही केला अशी माहिती इस्रोने दिली आहे.