नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेत केंद्र सरकारने गेल्या ३ आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयातील रद्दी, फाईल्स, ई कचरा आणि फर्निचर विकून तब्बल २५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढंच नाही तर ज्या ठिकाणी या रद्दी फाईल ठेवल्या होत्या. त्यांना हटवण्यात आल्याने तब्बल ३७ लाख चौरस फूट एवढी जागा मोकळी झाली आहे. ही जागा सेंट्रल व्हिस्टाच्या आकाराची आहे. इंडिया पोस्टने तर कार्यालयातील मोकळ्या झालेल्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी एक कॅन्टिन आणि एक गॅलरी बनवली आहे.
इंडिया पोस्टने या कँटिनचं नाव अंगण असं ठेवलं आहे. चीफ पोस्ट मास्टर जनरल मंजू कुमार यांनी सांगितले की, कधी काळी याच जागी वर्षांनुवर्षे कचऱ्याचा ढीग साचलेला होता. तसेच रद्दी, खराब एसी, कूलर कॉम्प्युटरसह इतर खराब फर्निचर पडलेलं होतं. डिप्टी डायरेक्टर जनरल अमरप्रीत दुग्गल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानापासून प्रेरणा घेत ही रद्दी विकण्यात आली आहे. त्यामधून लाखो रुपयांची कमाई झाली आहे. तसेच इथे आता एक सुंदर कँटिन आणि एक गॅलरी तयार करण्यात आली आहे.
अशाच प्रकारची मोहीम केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये राबवण्यात आली. यामध्ये इंडियन पोस्टच्या सुमारे १८ हजार, रेल्वेची ७ हजार स्टेशन, फार्मास्युटीकल विभागाच्या सहा हजार, डिफेन्सच्या ४ हजार ५००, गृहमंत्रालयाच्या सुमारे ४९०० साइट्सचा समावेश आहे. ही रिकामी झालेली जागा कुठल्या ना कुठल्या कामासाठी वापरली जाईल. तसेच सरकारला त्यातून उत्पन्नही मिळालं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मोहीम इतरही कार्यालयांमध्ये राबवता येऊ शकते.