रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, २०२२ साली जेव्हा या युद्धाला तोंड फुटलं होतं तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सडकून टीका केली होती. मात्र आता शशी थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असं विधान केलं आहे. तसेच आपण तेव्हा घेतलेल्या भूमिकेबाबत खेद वाटत आहे, असंही थरूर यांनी म्हटलं आहे.
त्याचं झालं असं की, २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाला तोंड फुटल्यानंतर शशी थरून यांनी तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. तेव्हा शशी थरूर संसदेमध्ये म्हणाले होते की, रशिया आपला मित्र आहे आणि त्यांचे सुरक्षेबाबतचे काही प्रश्न असतील. मात्र रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारतानं अचानक मौन बाळगणं युक्रेन आणि त्यांच्या समर्थकांसाठी निराशाजनक असेल. भारताने या मुद्द्यावर मौन बाळगणं हे दुर्दैवी आहे.
दरम्यान, आता तीन वर्षांनंतर शशी थरूर यांनी तेव्हाच्या परिस्थितीबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे आणि भारत सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती हे कबूल केले आहे. ते म्हणाले की, आता तीन वर्षांनंतर मला माझ्या त्यावेळच्या भूमिकेबाबत खूप खेद वाटत आहे. मी तेव्हा जी भूमिका घेतली होती ती योग्य नव्हती. फेब्रुवारी २०२२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेवेळी भारत सरकारच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकमेव व्यक्ती होतो. रशियाने युक्रेनवर केलेलं आक्रमण हे संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन असल्याचं मी म्हटलं होतं. सीमांची अखंडता आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या तत्त्वाचं इथे उल्लंघन झालं असल्याचं मी म्हटलं होतं. आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी बलप्रयोगाचा वापर आपण कायम अस्वीकारार्ह मानत आलो आहोत. या युद्धामध्ये या सर्व तत्त्वांचं उल्लंघन झालं असून, आणप त्याचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी मी तेव्हा केली होती.
मात्र तीन वर्षांनंतर आता असं वाटतं की मीच चुकीचा होतो. आज भारताकडे वास्तवात असा पंतप्रधान आहे जो दोन आठवड्यांच्या फरकाने युक्रेनच्या राष्ट्रपतींची आणि रशियाच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेऊ शकतो. या धोरणामुळे भारत कायमस्वरूपी शांततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. आपण युरोपमध्ये नाही ही सत्य परिस्थिती आहे. आपण युरोपमध्ये नाही आहोत. तसेच आपल्याला थेटपणे कसलाही धोका नाही आहे. खरंतर तेथील सीमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला काही फायदा होत नाही, असेही थरूर म्हणाले.