जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 05:59 AM2023-02-10T05:59:15+5:302023-02-10T05:59:23+5:30

एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

The more you throw mud, the more the lotus will bloom, even in the Rajya Sabha, the Prime Minister will attack the opposition | जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

जेवढी चिखलफेक कराल तेवढे कमळ फुलेल, राज्यसभेतही पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली : अदानी समूहाशी संबंधित प्रकरणावर विरोधी पक्षांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘आपल्यावर जितकी चिखलफेक होईल तितके कमळ फुलेल,’ अशी टीका विरोधकांवर केली. विरोधकांचे विविध मुद्दे त्यांनी सविस्तर खोडून काढले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर गुरुवारी राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्यास पंतप्रधानांनी सुरुवात करताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टीसह काही विरोधी पक्षांचे सदस्य व्यासपीठाजवळ आले आणि घोषणाबाजी करू लागले. सदस्यांच्या घोषणाबाजीवर मोदी म्हणाले, ‘‘त्यांच्याकडे होता चिखल, माझ्याकडे होता गुलाल. ज्याच्याकडे जे होते, ते त्याने उधळले... बरेच झाले. कारण, तुम्ही जितकी चिखलफेक कराल तितके कमळ फुलेल. त्यामुळे कमळ फुलवण्यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष त्यांचाही हातभार लागत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’’

पंतप्रधानांनी १ तास २५ मिनिटांच्या आपल्या संपूर्ण भाषणात सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करताना, त्यांच्या यशाची मोजदाद केली आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करत आभार प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.

काँग्रेसने ९० वेळा सरकारे पाडली
आज जे विरोधी पक्षात बसले आहेत, त्यांनी राज्यांचे अधिकार नष्ट केले होते. इतिहास पाहा, कोणता पक्ष सत्तेत होता ज्याने कलम ३५६ चा सर्वाधिक दुरुपयोग केला. ९० वेळा निवडून आलेली सरकारे पाडली, असे म्हणत मोदींनी उदाहरणादाखल केरळमधील डावे सरकार, तामिळनाडूमध्ये एमजी रामचंद्रन आणि करुणानिधी सरकार, महाराष्ट्रात शरद पवार सरकार, आंध्र प्रदेशातील एनटी रामाराव सरकार यांचा उल्लेख केला. 

भाजप खासदारांना व्हीप
कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपने आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करीत १३ फेब्रु.पर्यंत सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

काँग्रेसने ६० वर्षांत खड्डेच खड्डे केले
२०१४ मध्ये जेव्हा आपण देशाचे पंतप्रधान झालो तेव्हा ६० वर्षांत ‘काँग्रेस परिवाराने’ सगळीकडे खड्डेच खड्डे केलेले दिसले. कदाचित त्यांचा हेतू चांगला असेल; पण खड्डेच खड्डे केले होते. त्यामुळे सहा दशके वाया गेली. त्या काळात जगातील छोटे- छोटे देशही यशाच्या शिखरांना स्पर्श करत होते. पुढे सरकत होते, असे मोदी म्हणाले.

नेहरू आडनाव का ठेवत नाहीत?   
एक काळ असा होता की सुमारे ६०० सरकारी योजना आणि कार्यक्रमांना गांधी- नेहरू घराण्याची नावे देण्यात आली होती. गांधी कुटुंबातील कोणीही नेहरू हे आडनाव ठेवण्यास का घाबरतो हे समजत नाही. नेहरू आडनाव ठेवायला लाज वाटते का? एवढे महान व्यक्तिमत्त्व तुम्हाला मंजूर नाही. परिवाराला मंजूर नाही आणि तुम्ही आमचा हिशेब मागता, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपला बहुमत असताना जेपीसीची भीती का?
बुधवारी दुपारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा मुख्यत: विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी प्रकरणावर लक्ष ठेवण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या माहितीपटावर सरकारने ‘बंदी’ घातल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सरकारचे कोविड व्यवस्थापन, महिला आणि वृद्धांचा सन्मान आणि संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व, असे इतर मुद्दे उपस्थित केले गेले.   

मी एकटाच पडतोय सर्वांना भारी... -
आपल्या संपूर्ण भाषणात विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘‘ते एका तासाहून अधिक काळ एकटे बोलत आहेत आणि विरोधकांना घोषणा देण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागतो. मी एकटाच अनेकांवर भारी पडतोय... नारे बदलण्यासाठी त्यांना किती कसरत करावी लागत आहे; पण ते माझा आवाज थांबवू शकले नाहीत.’’ 

Web Title: The more you throw mud, the more the lotus will bloom, even in the Rajya Sabha, the Prime Minister will attack the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.