- संजय शर्मानवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील प्रसिद्ध मुघल उद्यानाचे नामकरण आता केंद्र सरकारने अमृत उद्यान, असे केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या अमृत उद्यानाचे उद्घाटन रविवार, २९ जानेवारी रोजी होणार आहे. ३१ जानेवारी ते २६ मार्च या कालावधीत अमृत उद्यान १२ ते रात्री ९ या वेळेत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
मोदी सरकारच्या नाव बदलण्याच्या मोहिमेत राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नवे नावही आता जोडण्यात आले असून, आज या मुघल गार्डनचे नाव अमृत उद्यान करण्यात आले आहे. यामागील मुघल शब्दाची अडचण फेटाळून लावत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा होत असल्यामुळे नवीन नाव अमृत उद्यान, असे करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर दिल्लीतील अनेक रस्त्यांचीही नावे बदलण्यात आली. अलीकडेच राजपथचे नाव बदलून कर्तव्य पथ असे करण्यात आले. पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रस्त्याचे नाव रेसकोर्स रोड बदलून लोककल्याण मार्ग केले आहे. औरंगजेब रोडचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम मार्ग करण्यात आले. इंडिया गेटमधून अमर जवान ज्योती हलवून राष्ट्रीय युद्ध स्मारकात स्थापित करण्यात आली.