‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ नाव पुढील सुनावणीपर्यंत राहणार कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 05:31 AM2024-02-20T05:31:55+5:302024-02-20T05:32:07+5:30
तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली : आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसशीशरद पवार यांच्या पक्षाच्या नावाचे साधर्म्य असल्यामुळे त्यांना हे नाव नाकारण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांच्या वतीने करण्यात आली. पण, तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे आदेश न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या तीन सदस्यीय पीठाने निवडणूक आयोगाला दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी, निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला. हा मतदारांचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते