नवी दिल्ली - केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. पण, आता या इमारतीच्या खर्चात 282 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर इमारतीचं काम वेगानं सुरू असून दोन महिन्यांपूर्वीच येथील अशोक स्तंभांचं अनावरण करण्यात आलं. आता, या संसद भवनला नाव देण्यावरुन मागणी करण्यात येत आहेत. खासदार असदुद्दीन औवेसी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं. त्यामुळे, या इमारतीचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षात ही इमारत बनून तयार होणे अपेक्षित आहे. ही प्रस्तावित चार मजली इमारत सुमारे 13 एकर क्षेत्रात पसरली आहे. राष्ट्रपती भवनाच्या अगदी जवळ असलेला हा प्रकल्प यापूर्वी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता या इमारतीस देण्यात येणाऱ्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
संसद सभागृह हे संविधानानुसार चालते, त्यामुळे, नव्या संसद भवनचं नाव हे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावावरुनच असावे, अशी मागणी एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी केली आहे. तसेच, तेलंगणामध्येही विधानसभेची नवीन इमारत बनत असून तिचेही नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भात तेलंगणा विधिमंडळात प्रस्तावही संमत करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील नवीन सेंट्रल विस्टा इमारतीचेही नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावेच करावे, अशी मागणी औवेसींनी केली आहे.
इमारतीसाठी खर्च वाढला, वेळही लांबला
सेंट्रल विस्टाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर एक वर्षांहून अधिक कालावधीत प्रकल्पाची किंमत सुमारे 29 टक्क्यांनी वाढून सूमारे 1250 कोटी झाली आहे. आधी या प्रकल्पाची किंमत सूमारे 977 कोटी रुपये होती. प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर 2020 मध्ये झाले होते. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या टाटा प्रोजेक्ट्सने जवळपास 40 टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, बांधकाम पूर्ण करण्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, आता या इमारतीचे बांधकाम पुढील वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.