१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून स्फोट घडवून आणला. त्यात ४० जवान शहीद झाले होते. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. आज या घटनेला ५ वर्षे पू्र्ण झाले. भारताच्या इतिहासात १४ फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची सेवा आणि आपल्या देशासाठीचं त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील.", असे ट्विट मोदींनी केले. सोशल मीडियातूनही त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवत शहीदांचे स्मरण केले जात आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विट करत २०१९ साली पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीर जवानांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन दिले पाकिस्तानला प्रत्युत्तर- काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले ४० CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकही केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या धाडसी निर्णयाचं भारतीय नागरिकांकडून मोठं समर्थनही करण्यात आलं. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३०० किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला. त्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. म्हणूनच, पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. मात्र, या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच, पाकिस्तानलाही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते.