बंगळुरू : भारताच्या चंद्रयान-३मधील विक्रम लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. या भव्य यशामुळे यापुढे २३ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. चंद्रावर विक्रम लँडर उतरला ती जागा शिवशक्ती पॉइंट तर ‘चंद्रयान-२’ काेसळले, ते ठिकाण ‘तिरंगा’ म्हणून यापुढे ओळखले जाईल अशा महत्वपूर्ण घोषणाही माेदी यांनी शनिवारी केल्या.
‘इस्रो’च्या ‘चंद्रयान-३’मधील विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. तसेच चंद्रावर अवकाशयान उतरविण्याची कामगिरी करणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या पंक्तीत आता भारताचाही समावेश झाला आहे. इतकी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बंगळुरू येथे ‘इस्रो’च्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधताना मोदी भावुक झाले होते.
दक्षिण आफ्रिका व ग्रीसच्या दौऱ्यावरून पंतप्रधान मायदेशात परतताच बंगळुरूला गेले व त्यांनी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले. राजशिष्टाचारानुसार माझ्या स्वागतासाठी येणारे कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना वाट पाहावी लागली असती. तुम्ही विमानतळावर येऊ नका, अशी विनंती मीच त्यांना केल्याचे माेदी म्हणाले.
राष्ट्रीय अंतराळ दिन प्रेरणादायी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह२३ ऑगस्टचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे. शाह म्हणाले की, चंद्राच्या संशोधनात भारताने मिळविलेल्या उत्तुंग यशाचा हा दिवस यापुढे आपल्याला व भावी पिढ्यांना सतत आठवण देत राहील तसेच या दिनामुळे शास्त्रज्ञांनाही यशाची नवी शिखरे गाठण्याची प्रेरणा मिळेल.
पंतप्रधान मोदी झाले भावुक
भारताच्या ‘चंद्रयान-३’चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाले त्यावेळी मी विदेश दौऱ्यावर होतो. मात्र, माझे सारे लक्ष देशाच्या ऐतिहासिक कामगिरीकडे लागले होते व मी मनानेही ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसोबतच होतो. ‘चंद्रयान-३’च्या भव्य यशाबद्दल ‘इस्रो’च्या सर्व शास्त्रज्ञांना वंदन करण्याची, त्यांना शुभेच्छा देण्याची इच्छा होत होती; पण त्यावेळी मी नेमका भारतात नव्हतो, हे उद्गार काढताना मोदी यांचा गळा दाटून आला. ते पुढे म्हणाले की, मायदेशी परतताच सर्वप्रथम मी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरविले हाेते.
‘युवकांना विज्ञानाची गोडी लावणे आवश्यक’ पंतप्रधान मोदी मायदेशात परतल्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इस्रो मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. मोदी यांचे भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व त्या पक्षाच्या खासदारांनी दिल्ली विमानतळावर स्वागत केले. त्यावेळी मोदी म्हणाले की, ‘चंद्रयान-३’च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगमुळे देशभरात जनतेमध्ये उत्साह संचारला आहे. ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशाचा उपयोग युवकांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी करायचा आहे.
सुरक्षारक्षकासाठी माेदींनी भाषण थांबविलेपंतप्रधान बंगळुरूहून शनिवारी दुपारी दिल्लीला आले. तेथील विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांसमोर मोदी भाषण करत होते. मात्र, अचानक त्यांनी आपले भाषण काही वेळ थांबविले. कारण, तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याने मोदी यांनी आपल्या वैद्यकीय पथकाला त्याच्यावर उपचार करण्यास सांगितले. ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधानांचा सुरक्षारक्षक होती, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
‘शास्त्रज्ञांच्या परिश्रमाला, धैर्याला, चिकाटीला सलाम’‘चंद्रयान-३’च्या यशस्वी कामगिरीबद्दल मी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना, त्यांच्या परिश्रमाला, धैर्याला, त्यांच्या चिकाटीला सलाम करतो. शास्त्रज्ञांनी आपल्या कामावरील निष्ठेने सर्वांना प्रभावित केले आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
माेहीमेची दाेन उद्दिष्टे साध्य
माेहिमेतील तीनपैकी दाेन महत्त्वाची उद्दीष्टे साध्य झाल्याचीही माहिती दिली.१. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित साॅफ्ट लॅंडिंग. - पूर्ण२. चंद्रावर राेव्हर चालविणे. - पूर्ण३. विविध नमुन्यांचे सखाेल परीक्षण करणे. - हे कार्य सध्या सुरू आहे.
‘आदित्य-एल१’ कडे आता लक्षचंद्रयान-३च्या यशानंतर आता इस्रोचे सारे लक्ष आदित्य-एल१कडे लागले आहे. या अवकाशयानाचे श्रीहरीकोटा येथून २ सप्टेंबरला प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी हाती घेतलेली ही पहिलीवहिली मोहीम आहे. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर असलेल्या सूर्याच्या अभ्यासासाठी एल-१ कक्षेत आदित्य-एल१ भ्रमण करणार आहे.
पाकिस्तानच्याही अखेर शुभेच्छाचंद्रयान-३चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झालेले सॉफ्ट लँडिंग ही अतुलनीय वैज्ञानिक कामगिरी आहे, असे पाकिस्तानने म्हटले. इस्रोच्या कामगिरीचे सर्व जगाने कौतुक केल्यानंतर सर्वांत उशिरा पाकिस्तानने चंद्रयान-३च्या यशाबद्दल प्रशंसा केली आहे.