पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. राष्ट्रपतींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन करावे, अशी मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. आरजेडीने या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या डिझाइनसंदर्भात वादग्रस्त ट्विटदेखील केले होते. यातच आता टीएमसी खासदार जवाहर सरकार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी, या नव्या संसद भवनाचे डिझाइन आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी केल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात ट्विट करत तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी म्हटले आहे, "सोमालियाने अपली जुनी संसद नाकारली, ती नव्या भारताताची प्रेरणा आहे! गुजरातमधील मोदींचे पाळलेले आर्किटेक्ट - जे नेहमीच 'स्पर्धात्मक बोली'च्या माध्यमाने मोदींचे मेगा कॉन्ट्रॅक्ट्स मिळवतात (अहमदाबाद, वाराणसी, दिल्लीची संसद + सेंट्रल विस्टामध्ये) त्यांनी आपल्याकडून सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यासाठी ₹230 कोटी एवढे शुल्क घेतले आहे."
यानंतर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जवाहर सरकार यांचे ट्विट रिट्वीट करत आणि पीएम मोदी यांना टॅग करत, "जवाहर सरकार यांना पूर्ण मार्क. सोमालियाने नाकारलेले संसद भवन आपल्या पंतप्रधानांची प्रेरणा आहे, यावर आपण विश्वास करू शकता," असे लिहिले आहे. एवढेच नाही, तर पीएमओला टॅग करत, कॉपी कॅट आर्किटेक्टकडून 230 कोटी रुपयांची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही दिग्विजय सिंह यांनी केली आहे.