नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीसह देशाच्या उत्तर-पश्चिम भागात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान दिल्लीसह उत्तर-पश्चिम भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार, २९ डिसेंबरपासून जेव्हा पश्चिमी भूमध्यसागरीय क्षेत्र कमी पातळी पूर्वेकडील वाऱ्यांच्या संपर्कात येईल, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात दिसून येईल. यामुळे ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२४पर्यंत मध्य भारतासह उत्तर-पश्चिम भागात पाऊस पडू शकतो.
देशातील या भागात पावसाची शक्यता-
सध्या दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात चक्रीवादळ सुरु आहे. हे वादळ बांगलादेश आणि त्याच्या आसपासच्या भागातही दिसून येते. ज्यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या पावसासह हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर मध्य प्रदेशात २५ डिसेंबरच्या सकाळी दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिल्ली-एनसीआर हवामानाची स्थिती काय?
दिल्लीच्या सध्याच्या हवामानाबद्दल बोललो, तर सध्या दिल्लीसह उत्तर भारताच्या मैदानी भागात किमान तापमान सामान्यपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअस जास्त आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस हवामान कोरडे राहणार असून यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, २६ डिसेंबरपासून दिल्ली एनसीआरमध्ये आकाशात ढगांची हालचाल दिसू शकते आणि यादरम्यान तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते.