आदेश रावल नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विदेशात जाण्यापूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना निर्देश दिले की, पक्षाला आपली गरज आहे. आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे की, आपण काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी कोण असावे, याचा निर्णय सोनिया गांधी घेणार आहेत.
अशोक गहलोत यांनी सांगितले की, माझ्यासह काँग्रेस पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना असे वाटते की, राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष केले जावे. त्यावर सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांना स्पष्ट सांगितले की, गांधी कुटुंबीयातील कोणीही सदस्य अध्यक्ष बनणार नाही आणि राहुल गांधी यांचाही हाच निर्णय आहे.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनीही आपल्या राजीनाम्यात हीच बाब मांडली होती. सोनिया गांधी यांच्या निर्देशानंतर अशोक गहलोत हे बुधवारी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करू इच्छित होते. पण, रात्री १२ वाजता ज्येष्ठ जयराम रमेश यांनी ट्वीट केले की, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीसाेबत उपचारासाठी राहुल, प्रियांका गांधी विदेशात जाणार आहेत.
राहुल गांधींशी चर्चा होऊ शकली नाही
- सूत्रांनी सांगितले की, गांधी कुटुंबीय विदेशात जाणार असल्याची माहिती यावेळी कोणालाही नव्हती आणि त्यामुळेच राहुल गांधी आणि अशोक गहलोत यांची चर्चा होऊ शकली नाही.
- अशोक गहलोत हे गांधी कुटुंबीयांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात.
- त्यामुळे त्यांच्याकडे सोनिया गांधी यांचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.