भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चित्ता संगोपन आणि संरक्षणाची मोहिम हाती घेतली होती. त्यानुसार, गतवर्षी त्यांच्या जन्मदिनी आफ्रिकेतील नामिबिया येथून नर आणि मादी अशा ८ चित्त्यांचे भारतात आगमन झाले होते. मोठ्या जल्लोषात या वन्य जीवांचे भारतात स्वागत करण्यात आले, त्यानंतर, मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये त्यांना सोडण्यात आले. मात्र, या ८ पैकी एक असलेल्या साशा नामक मादी चित्त्याचे २७ मार्च रोजी निधन झाले. साशाच्या जाण्याचे दु:ख असतानाचा आता कुनोमधून गुडन्यूज आली आहे. कारण, येथील एका माती चित्त्याने ४ बछड्यांना जन्म दिलाय.
नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ता सियायाने चार पिल्लांना जन्म दिल्यामुळे देशात त्यांचा कुटुंब-कबिला वाढू लागला आहे. सोमवारीच 'साशा' या मादी चित्त्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर निराशेचे मळभ चार पिल्लांच्या जन्मामुळे हटले. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे द्विट शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ही आनंददायक बातमी दिली आहे. त्यामुळे, कुनोमधील चित्त्यांची संख्या आणखी वाढली असून आता या पिलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
सोलर कुंपणातून होतेय चित्त्यांची निगराणी
गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडण्यात आले आहेत. हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करत आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जात आहे.