आतापर्यंत लोकांना वाचवण्यासाठी राबण्यात आलेल्या बचाव मोहिमांबाबत तुम्ही ऐकलं असेल. मात्र पार्टी करताना एका अधिकाऱ्याचा पाण्यात पडलेला मोबाईल बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून चार दिवसांनी तो मोबाईल बाहेर काढण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी सुरू झालेली ही शोधमोहीम गुरुवारी फोन बाहेर काढून संपली.
रविवारी पखांजूर येथील खाद्य निरीक्षक पदावरील अधिकारी राजेश विश्वास आपल्या मित्रांसोबत परलकोट जलाशयामध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. याचदरम्यान, त्यांच्याकडचा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल पाण्यात पडला. महागडा मोबाईल पाण्यात पडल्याने ते अस्वस्थ झाले. फोनचा शोध घेण्यासाठी ते जलाशयाजवळ पोहोचले. मोबाईलचा शोध घेण्यासाठी स्थानिक पाणबुड्यांनाही बोलावले. मात्र त्यांना मोबाईल शोधण्यात अपयश आले. त्यानंतर पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्यात आले. तसेच तीन दिवस सतत पाणी उपसा केल्यानंतर हा महागडा फोन हाती लागला.
मात्र या फोनचा शोध घेण्यासाठी सुमारे २१ लाख लिटर पाणी उपसून वाया घालवण्यात आले. एवढ्या पाण्यामध्ये सुमारे एक हजार एकरमध्ये पसरलेल्या पिकांचं सिंचन होऊ शकलं असतं. या प्रकारामुळे शेकडो शेतकरी त्रस्त झाले आहेत. पखांजूर येथील खाद्य निरीक्षक राजेश विश्वास हे स्थानिक आहेत. मात्र ते त्यांच्या वर्तनामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. स्वत:च्या रेशनकार्डवरील तांदुळामध्ये गडबड केल्याने एकदा त्यांचं निलंबनही झालं आहे. आता महागड्या मोबाईलसाठी चार दिवस शोधमोहीम राबवल्याने ते चर्चेत आले आहेत.
ज्या दरम्यान, खाद्य निरीक्षकांनी हे ऑपरेशन चालवले, त्यादरम्यान जलाशयातून चार दिवस पाणी बाहेर काढण्याबाबत वाद झाला होता. तक्रारीनंतर जलसंधारण विभागाचे एसडीओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाणी काढण्याचं काम बंद केलं. मात्र तोपर्यंत २१ लाख लिटर पाणी वाया गेले होते.