लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला १९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीच्या वातावरणामध्ये ओडिशामधील पोडमपेटा गावातील मतदार हे संभ्रमावस्थेत आहेत. त्याचं कारण म्हणजे २०११ च्या पावसाळ्यात येथील समुद्रात उसळेल्या लाटांमध्ये येथील ५ घरं समुद्राने गिळंकृत केली होती. तेव्हापासून या गावात राहणं कठीण झालं आहे. त्यानंतर येथील ग्रामस्थांचं सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्वसन केलं. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा या ग्रामस्थांसाठी जुन्या पोडमपेटा गावाजवळ मतदान केंद्र उभारण्यात येत असे. मात्र यावेळी व्यवस्था बदलली असून, यावेळी पोदमपेटा गावातील ग्रामस्थ तीन ठिकाणी मतदान करणार आहेत.
पोडमपेटा गाव हे ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून १४० किमी दूर असलेल्या गंजाम जिल्ह्यात आहे. येथील रहिवासी सांगतात की, मागच्या दोन दशकांमध्ये समुद्राने येथील अनेक घरं गिळंकृत केली आहेत. लोकांनी त्यांची घरं, मासे वाळवण्याचं मैदान आणि उदरनिर्वाहाची साधनं गमावली आहेत. मोठ्या जड अंत:करणाने गाव सोडावा लागलाय. भूस्खलनानंतर २०११-१२ मध्ये १०२ ग्रामस्थांना सहा किमी दूर अंतराव अससेल्या पोडागडा गावात वसवण्यात आलं. त्या गावाला न्यू पोडमपेटा म्हणतात. तर २०१३ मध्ये आलेल्या फेलिन चक्रिवादळानंतर गावातील इतर ३६१ कुटुंबांना मयूरपाडा गावामध्ये वसवण्यात आलं.
सुरुवातीला येथील लोक जुन्या गावाजवळ असलेल्या एका मतदान केंद्रावर मतदान करायचे. आता येथील रहिवाशांना तीन वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान करावं लागणार आहे. न्यू पोडमपेटामध्ये मतदान केंद्र नाही आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार न्यू पोडमपेटामधील २२० मतदार हे अरुणपूर प्राथमिक शाळेत मदतान करतील. १२० मतदारांना मतदानासाठी एन. बारापल्लीपर्यंत जावं लागेल. तर काही लोकांना मतदानासाठी मयूरपाडा येथे जावं लागणार आहे.