अंगावर घातलेले टकाटक कपडे पाहून एका मोठ्या घरातील मुलगा असावा, असा अंदाज बांधून एका टोकळ्याने तरुणाचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. जयपूरमधून अपहरण करण्यात आलेल्या एका तरुणाची राजस्थान पोलिसांनी पाच दिवसांनंतर ५०० किमी दूर अंतरावरील हिमाचल प्रदेशमधील सोलन येथून सुखरूपणे सुटका केली. या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी या तरुणाला चांगल्या कपड्यांमध्ये पाहिलं होतं. त्याचे कपडे पाहून तो चांगल्या श्रीमंत घरातील असावा असा अंदाज बांधत आरोपींच्या टोळक्याने त्याचं अपहरण केलं. मात्र पीडित मुलाचे वडील हे रिक्षाचालक असल्याचे समजल्यानंतर या टोळक्याची पंचाईत झाली. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तसेच एका व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्याने सहकाऱ्यांसह या तरुणाचं अपहरण केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात जयपूर पोलिसांनी शिताफीने तपास करून अपहृत तरुणाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. एवढंच नाही तर हिमाचल प्रदेशमधील ज्या हॉटेलमध्ये अपहरणकर्त्यांनी या तरुणाला डांबून ठेवले होते. तिथेच धडक देत ही कारवाई केली. एवढंच नाही तर ५ दिवसांपर्यंत अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या अनुज नावाच्या या तरुणाची त्याच्या वाढदिवसादिवशीच सुटका करत पोलिसांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला अनोखी भेट दिली.