- सुनील चावके नवी दिल्ली : संसदेच्या पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार नेमक्या कोणत्या धक्कातंत्राचा अवलंब करणार याचा अंदाजच येत नसल्यामुळे २८ पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीला हतबल होऊन बचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री झालेल्या विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीत त्यामुळे या अधिवेशनासाठी कोणतीच रणनीती निश्चित होऊ शकली नाही.
केंद्र सरकारने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात काही तरी मोठे घडणार याची विरोधी पक्षांना जाणीव आहे; पण ते अकल्पित काय असेल याची स्पष्ट कल्पनाच येत नसल्यामुळे कसा प्रतिसाद द्यावा हे ठरवता येत नसल्याचे वैफल्य खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिसून आले.
असे गोपनीय काय? खासदारांनी या अधिवेशनात कशासाठी यावे? तुमचा कोणता गोपनीय अजेंडा आहे? कार्यक्रम का लपवता आहात? संसदेच्या विशेष अधिवेशनात लग्न आहे, मौंज आहे, श्राद्ध आहे की वाढदिवस आहे, असे सवाल संजय राऊत यांनी केले.
विरोधक सावधकोणताही प्रस्ताव किंवा विधेयक संसदेत मांडले गेल्यास विरोधी पक्षांनी सभात्याग, बहिष्कार किंवा निषेध करण्याऐवजी विचारपूर्वक भूमिका घेण्याचा सल्ला काँग्रेसने दिला आहे. सरकारच्याच अजेंड्याचे वर्चस्व राहणार असल्यामुळे विरोधी पक्षांना चर्चा करण्याची संधी मिळणार नाही.