नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मांडण्यात आलेल्या आभार प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या वक्तव्यातील काही भाग हटविण्यास विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी आक्षेप घेतला. आपण काही असंसदीय बोललो असे वाटत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्यानंतर खरगे यांच्या भाषणातील वाक्य कामकाजातून वगळण्यात आली.खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे.
आपचाही सभात्यागकाँग्रेसचे मुकुल वासनिक म्हणाले की, खरगे यांनी आपले म्हणणे मांडले; परंतु त्यांची काही वक्तव्ये कामकाजातून काढून टाकण्यात आली. त्यांनी असे काय म्हटले की, त्यांची वक्तव्ये कामकाजातून काढून टाकण्यात आली, असा सवाल वासनिक यांनी केला. तत्पूर्वी, सभापतींनी आमचे (आप) संजय सिंह आणि बीआरएसचे सदस्य डॉ. के. केशव राव यांचे स्थगन प्रस्ताव फेटाळल्याचे सांगितले. त्यानंतर ‘आप’च्या सदस्यांनी सभात्याग केला. ईडी चौकशी का करत नाही?सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करावी, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागे लागलेले अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कंपनीची चौकशी का करत नाही? असा सवाल तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगता रॉय यांनी गुरुवारी लोकसभेत विचारला.