Akhilesh Yadav on shivaji maharaj statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सोमवारी (२६ ऑगस्ट) घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात आणि देशात उमटले आहेत. लोक संताप व्यक्त करत असून, विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर आगपाखड केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर राजकारण तापले आहे. महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. अखिलेश यादव यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. या घटनेची चौकशी करून कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. "मोदींनी अनावरण केलेला पुतळा पडणे दुर्दैवी"
अखिलेश यादव यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, "भाजपने केलेले प्रत्येक काम भ्रष्टाचाराचा बळी ठरत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचे अनावरण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, तो कोसळणे दुर्दैवी घटना आहे."
"पुतळा उभारण्याशी संबंधित सर्व सरकारी आणि खासगी लोकांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी", अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेल -अखिलेश यादव
अखिलेश यादव यांनी पुढे म्हटले आहे की, "ही केवळ महाराष्ट्राला नाही, तर संपूर्ण देशाच्या भावना दुखावणारी घटना आहे. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजप भ्रष्टाचाराच्या अशा कृत्यांना भाजपचे सरकार पाडून उत्तर देईल", असे टीकास्त्र अखिलेश यादव यांनी डागले.