लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्याच्या दृष्टीने सूचीबद्ध करण्याचा विचार करू, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. सरन्यायाधीश संजीव खन्ना व न्यायमूर्ती संजयकुमार, न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने जमियत उलेमा मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार आणि केवी विश्वनाथन यांच्या बेंचने जमियत उलमा - ए - हिंदची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकला. त्यानंतर हे मत व्यक्त केले.
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात दाखल झालेल्या १०हून अधिक याचिका त्वरित सुनावणीसाठी घ्याव्यात, अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी आणि वकील निजाम पाशा यांनीही खंडपीठाला केली. या याचिका सूचीबद्ध करण्याच्या मागणीचा ई-मेल याचिकादारांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा, असे आदेश खंडपीठाने दिले. संसदेने विधेयक मंजूर केल्यानंतर काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्यासह आणखी काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली.
कायद्याला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्याचे घर जाळलेवक्फ सुधारणा कायद्याला पाठिंबा दिल्याबद्दल भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मणिपूरचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घरावर एक जमाव चाल करून गेला. त्यांच्या घराला आग लावण्य़ात आली. थौबल जिल्ह्यातील लिलाँग येथे रविवारी रात्री ही घटना घडली. त्यामुळे संपूर्ण लिलाँग विधानसभा मतदारसंघात सोमवारी जमावबंदी लागू करण्यात आली. अस्कर अली यांच्या घराची संतप्त जमावाने नासधूस करून ते जाळले. त्या घटनेनंतर अली यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आता भूमी जिहाद थांबणार; भाजप आमदाराचे वक्तव्यवक्फ सुधारणा कायदा अंमलात आल्याने आता देशातील भूमी जिहाद थांबेल असे तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी म्हटले आहे. रामनवमीच्या कार्यक्रमात रविवारी त्यांनी सांगितले की, जे वक्फ नोटीस देऊन जमिनीचा कब्जा करत होते त्यांना आता चाप बसणार आहे. बदललेल्या कायद्यामुळे मुस्लिमांची जमीन कोणीही हिसकावून घेणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.