अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षामधील वरिष्ठ नेत्या आतिशी यांची पक्षाकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारमध्ये किती आणि कोण मंत्री असलीत याचंही चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतिशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळामध्ये एकूण पाच मंत्री असणार आहेत. त्यामध्ये गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे.
दरम्यान, दिल्लीच्या नायब राज्यपालांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजीनामा आणि आतिशी यांच्याकडून नव्या सरकारची स्थापना करण्यासाठी केलेल्या दाव्याचं पत्र राष्ट्रपतींकडे पाठवले आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आतिशी यांची आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नायब राज्यपाल व्ही. के सक्सेना यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठीचा दावा सादर केला होता. दरम्यान, नायब राज्यपालांनी नव्या सरकारच्या शपथविधीसाठी २१ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.