नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतील रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. तसेच महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही नरेंद्र मोदींनी केले. त्यानंतर दिल्लीहून निघालेलं पहिलं विमान अयोध्येत दाखल झालं. विमानात बसलेल्या प्रवाशांनी यावेळी जय श्री रामच्या घोषणा दिल्या.
अयोध्येत दाखल होणाऱ्या पहिल्या विमानाचे पायलट कॅप्टन आशुतोष शेखर हे होते. आशुतोष शेखर हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी पाटणा येथील सेंट केर्न्स स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. अत्यंत अनुभवी पायलट असण्यासोबतच आशुतोष शेखर यांच्या नावावर एक विश्वविक्रमही असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक वेगाने उड्डाण करण्याचा जागतिक विक्रम-
आशुतोष शेखर हे 1996 मध्ये विद्यार्थी पायलट म्हणून नागरी विमानचालनात सामील झाले. त्यांच्याकडे 11,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. ते 2015 पासून 5 वर्षांपासून लाइन ट्रेनर आहेत आणि 2020मध्ये ऑडिट पायलट म्हणून इंडिगो येथे फ्लाइट ऑपरेशन्स सेफ्टी टीममध्ये सामील झाले. व्यावसायिक मार्गावर सर्वाधिक वेगाचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. देशांतर्गत मार्गावर विश्वविक्रम करणारा तो पहिला भारतीय वैमानिक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या होत्या शुभेच्छा-
कॅप्टन आशुतोष शेखर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास मानले जातात. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन आशुतोष यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. हे कॅप्टन आशुतोष यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते.