IAS Officer Wife Murder Case ( Marathi News ) : माजी आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखनौ इथं घडली आहे. मात्र या हत्या प्रकरणाला २४ तास उलटून गेल्यानंतरही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. महिलेची हत्या करून घरातील मुद्देमालही चोरून नेण्यात आला आहे. मात्र खरंच चोरीच्या उद्देशाने ही घटना घडली की हत्येच्या गुन्हेला वेगळं वळण देण्यासाठी चोरीचा बनाव करण्यात आला आहे, याबाबतचे गूढही कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी दुबे असं हत्या करण्यात आलेल्या ६५ वर्षीय महिलेचं नाव आहे. हत्येनंतर पोलिसांना दुबे यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावे हाती लागले आहेत. या सीसीटीव्हीमध्ये चोरांच्या येण्या-जाण्याचा मार्ग स्पष्ट होत आहे. या प्रकरणात दुबे यांच्या परिचयातीलच कोणाचा तरी सहभाग असण्याची शंका पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी देवेंद्र दुबे हे दररोज सकाळी ७ वाजताच्या आसपास गोल्फ खेळायला जात असत. त्यानंतर ७ ते ७.१५ वाजताच्या आसपास दूधवाला दूध देऊन जात असे आणि घरकाम करणारी महिला ८ ते ८.३० आसपास येत असे. त्यामुळे गुन्हेगारांनी दुबे यांच्या घरात घुसण्यासाठी मधली वेळ निवडली आणि दूधवाले जाताच दोन तरुण निळ्या रंगाच्या स्कुटीवर आतमध्ये आले. या तरुणांनी सीसीटीव्हीतून आपली ओळख स्पष्ट होऊ नये, यासाठी हेल्मेटदेखील घातले होते.
चोरांना घरात घुसण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला नसल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे. आरोपींमध्ये मोहिनी दुबे यांच्या ओळखीचं कोणीतरी असण्याची शक्यता आहे. कारण त्या ओळखीच्या व्यक्तीला पाहूनच दुबे यांनी दरवाजा उघडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
दरम्यान, चोरी आणि हत्येच्या घटनेनंतर आरोपी ज्या दिशेने पळून गेले, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. आरोपींनी आणलेल्या स्कुटीवर नंबरप्लेट होती मात्र त्यावर कोणताही नंबर नव्हता. त्यामुळे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.