नवी दिल्ली - दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया सध्या कोठडीत आहेत. त्यामुळे, कोठडीतून न्यायालयात आणि न्यायालयातून पोलीस तुरुंगात त्यांना आणलं जातं. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी त्यांना न्यायालयात नेण्यासाठी तुरुंगातून बाहेर काढलं होतं. मात्र, यावेळी चक्क त्यांच्या कॉलरला पकडून अगदी गावगुंडांप्रमाणे त्यांना ओढत नेलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, दिल्ली पोलिसांनी वरुन तसे आदेश आले आहेत का? असा सवालही त्यांनी विचारलाय.
मनिष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांना सीबीआय कोडठीत पाठवण्यात आलं आहे. यादरम्यान, आप नेत्या आतिशी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन मनिष सिसोदिया यांना पोलीस नेत असल्याचा व्हिडिओ शेअर केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तो व्हिडिओ रिट्विट करत केंद्र सरकारला लक्ष्य केलं. संबंधित व्हिडिओत पत्रकारांकडून मनिष सिसोदिया यांना केंद्र सरकारच्या अध्यादेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, सिसोदिया काहीतरी बोलणार, तितक्यात पोलीस अधिकाऱ्याने त्यांची कॉलर पकडून त्यांना वेगाने पुढे नेले. त्यांना तुरुंगातून कोर्टात नेत असताना ही घटना घडली.
पोलिसांना अशाप्रकारे मनिष सिसोदिया यांच्यासमवेत व्यवहार करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा अपप्रचार असल्याचं म्हटलंय. तसेच, मनिष सिसोदिया यांना पोलिसांनी ज्याप्रकारे पकडून नेले, ते त्यांच्या सुरक्षेसाठी गरजेचं होतं, असेही पोलिसांनी म्हटलंय. तसेच, न्यायालयीन कोठडीत असलेल्या व्यक्तीला माध्यमांशी संवाद साधणे हे कायदेशीर नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. दरम्यान, खासदार राघव चड्ढा यांनीही व्हिडिओ ट्विट करत दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, देशातील नावाजलेल्या माजी शिक्षणमंत्र्यांसोबत हा व्यवहार योग्य नसल्याचेही ते म्हणाले.