भोपाळ : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विश्रांती देत भाजपने मोहन यादव यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केलं आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या निरीक्षकांची एक टीम भोपाळला पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. शिवराजसिंह चौहान यांच्यासारख्या अनुभवी आणि चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अनुभवी नेत्याला डावलून भाजपने यादव यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवल्याने देशभरात त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.
मोहन यादव हे उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून ते शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री होते. यादव यांच्याकडे उच्चशिक्षण खात्याची जबाबदारी होती. उज्जैनमधील भाजपचे लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. हिंदुत्ववादी असणाऱ्या मोहन यादव यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगलीच जवळीक आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही त्यांचे मधूर संबंध आहेत. विद्यार्थी राजकारणापासून यादव यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीशी सुरुवात केली होती. २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा यादव यांनी निवडणुकीत विजयी होत विधानसभेत धडक दिली. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले.
५८ वर्षीय मोहन यादव हे उच्चशिक्षित असून त्यांनी एमबीए आणि पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजातील नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड केल्यानंतर मध्य प्रदेशात भाजपने ओबीसी चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मोहन यादव यांच्या माध्यमातून भाजपने सोशल इंजिनिअरिंग केल्याचं बोललं जात असून त्यांच्या निवडीचा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीतही फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भोपाळमध्ये आज काय घडलं?
भाजपकडून मध्य प्रदेशात मुख्यमंत्री निवडीसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आशा लाकडा आणि के. लक्ष्मण या तीन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. हे तिघेही आज मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी सर्वात आधी शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच हे तीनही निरीक्षक भोपाळमध्ये गेल्याची माहिती आहे. मनोहरलाल खट्टर हे मध्य प्रदेशात पोहोचल्यापासूनच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्यांच्या संपर्कात होते. अखेर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.