हरीश गुप्तानवी दिल्ली : के. विजय राघवन हे २ एप्रिल रोजी निवृत्त झाल्यापासून भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागाराचे पद रिक्त आहे. आश्चर्यकारक म्हणजे सरकार या पदाशिवाय असल्याचे गेल्या २० वर्षांत असे कधीच घडले नाही.
वाजपेयी यांच्या काळात हे पद निर्माण करण्यात आले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि आर. चिदंबरम यांच्यासह अनेक मान्यवरांनी हेे प्रतिष्ठेचे पद भूषविले आहे. राघवन यांना २०१८ मध्ये सुरुवातीला तीन वर्षांसाठी या पदावर नियुक्त करण्यात आले होते. नंतर त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती आणि अखेर ते २ एप्रिल रोजी या पदावरून ते निवृत्त झाले. प्रधान वैज्ञानिक सल्लागार होण्याआधी राघवन हे जैविक तंत्रज्ञान विभागत सचिव होते. प्रधान वैज्ञानिक सल्लागार या पदाचा निश्चित असा कालावधी नाही.
कलाम हे भारताचे पहिले प्रधान वैज्ञानिक सल्लागार (१९९९-२००२) होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यामुळे या पदावर एखादी व्यक्ती किती काळ राहू शकते, याला फारसे प्राधान्य नाही. राघवन यांच्या कार्यकाळातच संशोधनाच्या सहा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पंतप्रधानांची वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद स्थापन करण्यात आली होती.
राघवन यांचा उत्तराधिकारी घोषित केलेला नाही; परंतु या पदासाठी इस्रोचे शास्रज्ञ शैलेश नायक (माजी सचिव, पृथ्वी विज्ञान विभाग), सीएसआयआरचे मावळते महासंचालक डॉ. शेखर सी. मांडे अणाि डॉ. आशुतोष शर्मा (माजी केंद्रीय सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग) यांची नावे चर्चेत आहेत.