लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: कुटुंबातील प्रत्येकाला काय हवे-नको याकडे घरातील महिलेचे बारकाईने लक्ष असते. एखादा सदस्य आजारी पडला तर त्याची देखरेख आणि उपचारांमध्येही महिलाच अधिक लक्ष घालते; परंतु महिलाच जर आजारी पडली तर मात्र तिच्याकडे इतरांकडून तितक्या काळजीने पाहिले जाते असे नाही; परंतु आता स्थिती बदलली आहे. २०२३-२४ च्या चालू आर्थिक वर्षात आरोग्य विमा काढणाऱ्या महिलांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४० टक्क्यांनी वाढले आहे.
महिला यासाठी अन्य कुणाच्या मेहेरबानीवर विसंबून न राहता आरोग्य विमा काढण्यासाठी सरसावल्या आहेत. मागील दोन वर्षांत महिलांमध्ये आरोग्य विम्याबाबत जागरूकता नेमकी किती वाढली, याचा पाहणी ‘पॉलिसी बाजार’च्या अहवालात करण्यात आली आहे. मातृत्व विमा घेमाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्तन तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसाठी विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
गंभीर आजारांसाठी जादा पैसे मोजण्याची तयारी
- २५ लाखांपेक्षा अधिक रकमेचा विमा काढणाऱ्या महिलांचे प्रमाण १५ टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर गेले आहे. अधिकाधिक आजारांवर संरक्षण कसे मिळेल, याकडे महिला अधिक लक्ष देत आहेत. फायब्रॉइड्स, स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर आदी गंभीर आजारांचाही त्यात समावेश आहे.
- कमी रकमेचा विमा काढणाऱ्या महिलांचे प्रमाण ७ टक्क्यांनी घटले आहे. महिलांमध्ये आलेली जागृती केवळ शहरांपुरती मर्यादित नाही. टिअर-२ शहरांमध्ये आरोग्य विमा घेणाऱ्या महिलांचे प्रमाण १०.५ टक्के, तर टिअर-३ शहरांध्ये ते ४.३ टक्के वाढले आहे.
महत्त्वाची आकडेवारी
- ४३% महिलांनी आरोग्य विमा काढताना स्टँड अलोन कव्हरेजला प्राधान्य दिले.
- ३१% इतकी वाढ मातृत्व विमा काढणाऱ्या महिलांमध्ये झाली आहे.
- २०% इतके प्रमाण गंभीर आजारांसाठी विमा घेणाऱ्या महिलांचे वाढले आहे.
- २५% वाढ विम्यासाठी दावा दाखल करणाऱ्या महिलांमध्ये झाली आहे.
- १०% इतकी वाढ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्या महिलांमध्ये झाली आहे.
सर्व वयोगटांतील वाढ
४० वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांमध्ये आरोग्य विमा काढणाऱ्यांचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून वाढून ५२ टक्के इतके झाले आहे. इतर वयोगटांतही हे प्रमाण वाढले आहे