इस्त्रोचे चंद्रयान ३ यशस्वी झाले, प्रज्ञान रोव्हरने संशोधनही केले. इस्त्रोने अनेक नवी माहिती जगाला दिली, चंद्रावर अंधार असल्यामुळे प्रज्ञान रोव्हर बंद अवस्थेत आहे. दरम्यान, आता इस्त्रोने चंद्रयान ३ संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. 'चंद्रावर रोव्हर पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असं एस सोमनाथ यांनी म्हटले आहे. कोचीमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे.
ISRO सोबत बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद काम करणार! एस सोमनाथ यांनी सांगितले काय असणार काम
एस सोमनाथ म्हणाले, रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्लिप मोडमध्ये आहे,पण तो पुन्हा सक्रिय होऊ शकत नाही हे नाकारता येत नाही. तो चंद्राच्या पृष्ठभागावर शांतपणे स्लिप मोडमध्ये आहे. आम्ही त्याला त्रास देणार नाही. जेव्हा त्याला झोपेतून उठवण्याची गरज असते तेव्हा तो स्वतःच उठतो. आम्ही त्यात अडथळा आणणार नाही.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-3 मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या मिशनच्या माध्यमातून संकलित केलेली वैज्ञानिक माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहे. या मोहिमेत लँडर आणि रोव्हरचा समावेश होता. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर काम पूर्ण केले. २ सप्टेंबर रोजी रोव्हर स्लिप मोडमध्ये पाठवण्यात आले. विक्रम आणि रोव्हरला झोपायला लावण्यापूर्वी सर्व पेलोड्स बंद करण्यात आले जेणेकरून ते सकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकतील.
२२ सप्टेंबर रोजी, इस्रोने आपल्या चंद्र मोहिमेतील चंद्रयान-3 च्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्यांच्याकडून कोणताही संकेत मिळालेला नाही. यापूर्वी, २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरल्यानंतर, लँडर, रोव्हर आणि पेलोडने एकामागून एक प्रयोग केले जेणेकरून ते १४ दिवसात पूर्ण करता येतील. चंद्रावरील एक दिवस पृथ्वीवरील १४ दिवसांच्या बरोबरीचा असतो.
चंद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून इतिहास रचला. यासह भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणताही देश पोहोचू शकलेला नाही. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने चंद्रावर पाय ठेवला होता, मात्र ते दक्षिण ध्रुवावर उतरू शकले नव्हते. चंद्रयान-3 लँडरचे सॉफ्ट लँडिंग ४ टप्प्यात झाले.