हासन (कर्नाटक) : देशभरात टोमॅटोचे दर १०० रुपयांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्यानेही तिच्या शेतातील टोमॅटो बाजारात नेण्यासाठी तोडून ठेवले होते. परंतु, रात्रीतून चोरट्यांनी सुमारे ५० ते ६० कॅरेट टोमॅटो लंपास केले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
धारिणी नामक महिला शेतकऱ्याने तिच्या शेतात टोमॅटोची लागवड केली होती. दमदार पीक आल्याने आणि सध्या १०० ते १२० किलो दर असल्याने ती आनंदात होती. बाजारात टोमॅटो नेण्यासाठी तिने तोडणी केली. मात्र, बुधवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तोडणी केलेल्या टोमॅटोची ५० ते ६० कॅरेट लंपास केली. तसेच शेतातील उर्वरित मालही खराब केला. हाता-तोडांशी आलेले पीक चोरीला गेल्याने धारिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.