संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ पूर्वी एनडीएमध्ये सहभागी होत असलेल्या मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:कडे घेतली आहे. एनडीए खासदारांचे १० समूह तयार केले असून, त्यांची बैठक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत होईल. एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये आपसातील समन्वय व सद्भाव वाढवण्याचा व तो तळागाळापर्यंत नेण्याचा या बैठकांचा उद्देश आहे.
अशा बैठका घेण्यासाठी भाजप नेते, केंद्रीय मंत्री, एनडीएच्या मित्रपक्षांचीही एक महत्त्वाची बैठक गुरुवारी संसद भवनात बोलावण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. अपना दलच्या नेत्या, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांचीही या बैठकीत उपस्थिती होती. एनडीएच्या मित्रपक्षांत आपसातील सहयोग, समन्वय वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली. अशा बैठका यापुढेही घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नेत्यांच्या काय तक्रारी?nभाजपचे नेते, खासदार आपल्याशी सहकार्य करणे तर दूरच, परंतु बोलतसुद्धा नाहीत, असा मुद्दा ३९ पक्षांच्या एनडीएमध्ये सहभागी असलेल्या लहान-लहान पक्षांनी दोन दिवसांपूर्वीच्या बैठकीत उपस्थित केला होता. nकाही केंद्रीय मंत्र्यांची तक्रार करताना त्यांनी म्हटले होते की, ते आमची कामे करणे तर दूरच, आम्हाला भेटण्यासाठी वेळही देत नाहीत. nअशा तक्रारी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, एनडीए खासदारांचे १० समूह तयार केले जात आहेत. त्यांची बैठक स्वत: पंतप्रधान घेणार आहेत.