मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी राज्यातील दारू बंदीसंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. त्या सातत्याने अयोध्या आंदोलनाची आठवण करून देत, आता ओरछामध्ये जे काही होईल ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी उदाहरण बनेल, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
भाजपच्या फायर ब्रँड नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमा भारती यांनी काही दिवसांपूर्वीच बुंदेलखंडच्या ‘अयोध्या’ ओरछामध्ये एका दारूच्या दुकानावर शेन फेकले होते. या घटनेनंतर संबंधित दारूचे दुकान बंद करण्यात आले होते. मात्र, भाऊबीजेच्या दिवशी हे दुकान पुन्हा उघडण्यात आले.
उमा भारती कठोर - हे दुकान उघडलेले पाहून उमा भारती भडकल्या आहेत. त्या 27 ऑक्टोबरला ट्विट करत म्हणाल्या, ‘मला अयोध्येची खूप आठवण आली. अयोध्येने आपल्याला लोकसभेच्या दोन जागांवरून दोन वेळा केंद्रात बहुमताने सरकार बनवण्याची कुवत दिली. ढांचा पडला, तेव्हा ते बेकायदेशीर कृत्य मानले गेले. आम्हा सर्वांकडे गुन्हेगार म्हणून पाहिले गेले आणि शेवटी आमच्या गुन्ह्यानंतर आज भव्य राम मंदिर बांधले जात आहे.’ तसेच आणखी एका ट्विट मध्ये उमा भारती म्हणाल्या, ‘ओरछातील हे देशी-विदेशी दारूचे दुकान मला प्रेरणा देते, की येथे जे काही होईल, ते संपूर्ण मध्यप्रदेशसाठी एक उदाहरण ठरेल. बघुया काय होते.’
तत्पूर्वी, गेल्या काही दिवासंपूर्वी उमा भारती यांनी घोषणा केली होती, की त्या 7 नोव्हेंबरपासून घर सोडतील. 7 नोव्हेंबर ते 14 जानेवारीपर्यंत त्या घरात राहणार नाहीत. 7 नोव्हेंबरपासून लक्ष्य प्राप्ती पर्यंत, जोवर दारूसंदर्भातील नवे धोरण दिसत नाही, तोवर मी घरात राहणार नाही, मी जंगलात राहीन, उघड्यावर राहीन, तंबूत राहीन. धार्मिक स्थळांवर राहीन. मी नदीच्या काठावर अथवा झाडाखाली अथवा दारूच्या दुकानासमोर तंबू टाकीन.