नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (एलएसी) डेमचोक व डेपसांग या दोन ठिकाणांवरील सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे व तिथे लवकरच गस्त सुरू होणार असल्याचे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. दिवाळीनिमित्त दोन्ही देशांचे सैनिक उद्या, गुरुवारी परस्परांना मिठाई देणार आहेत. पण हा समारंभ नेमका कोणत्या ठिकाणी होणार याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.सैन्य मागे घेण्याची पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांनी काही बाबींची पडताळणी सुरू केली आहे.
गलवानमध्ये झाला होता मोठा संघर्षभारत, चीनच्या लष्करांमध्ये गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये संघर्ष झाला होता. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी २१ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, भारत व चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सैन्य मागे घेण्याबाबत करार करण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून बोलणी सुरू होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तसा करार झाला. आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
यात आमची काहीही भूमिका नाही : अमेरिकाभारत-चीनच्या सीमेवरील तणाव कमी करण्यात आम्ही कोणतीही भूमिका बजावत नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी झाल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले. ‘संबंध सुरळीत होणार’ भारतातील चीनचे राजदूत क्सू फेईहाँग यांनी कोलकाता येथे सांगितले की, या करारानंतर आता दोन्ही देशांतील संबंध भविष्यात सुरळीत होण्यास मदत होणार आहे.