अयोध्या : अयोध्येतील भगवान राम मंदिर जानेवारी २०२४ मध्ये मकरसंक्रांतीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिराची उभारणी करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, मुख्य मंदिराचे ४० टक्के आणि एकूण परिसराचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारणीतील प्रगती आणि गुणवत्ता याबाबत आम्ही समाधानी आहोत.
ते म्हणाले की, मंदिराचा तळमजला डिसेंबर २०२३ पर्यंत तयार होईल. त्यानंतर १४ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल आणि मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येईल. मंदिर उभारणीचे काम पाहता येईल अशा ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी मंगळवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील शनिवारी ज्या ठिकाणाहून मंदिर उभारणीच्या कामाचा आढावा घेतला होता त्या ठिकाणीही पत्रकारांना नेण्यात आले.
१,८०० कोटींचा खर्च राय यांनी सांगितले की, मंदिर उभारणीसाठी १८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंदिर परिसरात प्रमुख साधू, संत यांच्या मूर्तींसाठी जागा तयार करण्यात येईल. या योजनेंतर्गत मंदिर परिसरात ७० एकर भागात वाल्मिकी, केवट, शबरी, जटायू, सीता, विघ्नेश्वर आणि शेषावतार (लक्ष्मण) यांची मंदिरेही उभारण्यात येणार आहेत. राजस्थानातील मकराना येथून पांढरे संगमरवर आणले जात असून मंदिराच्या गर्भगृहात त्यांचा उपयोग केला जाईल.