बिहारमध्ये फ्लोर टेस्ट होण्यापूर्वी राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. बिहार पोलीस रविवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे माजी उपमुख्यमंत्री तथा आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या निवासस्थानाबाहेरील परिसराला छावणीचे स्वरूप आले असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एसडीएम आणि एसपी सिटी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. पोलीस पोहोचल्यानंतर, तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर आरजेडी नेते संतप्त होऊन घोषणाबाजी करू लागले. जेव्हा पोलीस तेथून बाहेर पडले, तेव्हा, आरजेडी समर्थकांनी त्यांच्या वाहनामागे धावात घोषणाबाजी केली.
खरे तर, आरजेडी आमदार चेतन आनंद यांच्या लहान भावाने, आपल्या भावाला तेजस्वी यादव यांनी हाऊस अरेस्ट केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. यानंतर एसडीएम आणि एसपी तेजस्वी यादव यांच्या निवास्थानी पोहोचले, असे सांगण्यात येत आहे.
चेतन आनंद हे बाहुबली आनंद मोहन यांचे पुत्र आहेत. तेजस्वी यादव यांच्या बंगल्यावर शनिवारी आरजेडी आमदारांची बैठक पडली. यानंतर फ्लोअर टेस्ट होईपर्यंत आमदारांना तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानीच राहण्यास सांगण्यात आले. या आमदारांच्या बॅग आणि कपडेही त्यांच्याच निवासस्थानी मागवण्यात आले. यानंतरच चेतन आनंद यांचा लहान भाऊ अंशुमन आनंद यांनी पोलिसांत एफआयआर दाखल करत, त्यांच्या भावाला तेजस्वी यादव यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी पोहोचले होते.