Delhi Shahdara Murder:दिल्लीतील शाहदरा भागात ४० वर्षीय आकाश शर्मा आणि त्यांच्या पुतण्याला फटाके फोडत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या हल्ल्यात १० वर्षांचा मुलगाही जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये १६ वर्षांचा मुलगा हल्लेखोरासह स्कूटरवरून आकाश यांच्या घरी पोहोचला. त्याने आधी आकाश यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर अल्पवयीन आरोपीने इशारा करताच स्कूटरवरून आलेल्या व्यक्तीने आकाश यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर हल्लेखोराने पुतण्यावरही गोळ्या झाडल्या. आकाश यांच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगा हा त्यांचाच नातेवाईक असल्याचे समोर आलं आहे.
पूर्व दिल्लीतील शाहदरा येथील फरश बाजार परिसरात दिवाळीच्या दिवशी झालेल्या काका-पुतण्याच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार १६ वर्षांचा मुलगा असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलाने हत्येसाठी शूटर नेमला होता. या हत्येची योजना त्याने १७ दिवस अगोदरच आखली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र आता मृत आकाश यांचा भाऊ योगेश यांच्या म्हणण्यांनुसार अल्पवयीन मुलगा हा त्यांचाच पुतण्या आहे आणि पैशांच्या वादातून हे सर्व घडलं आहे.
"ही घटना गुरुवारी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरून माझा पुतण्या आणि एक अनोळखी व्यक्ती असे दोन जण आले होते. माझ्या भावाचा आणि मुलाचा दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने खून केला. काही महिन्यांपूर्वी माझ्या भावाचा पैशावरून कोणाशी तरी वाद झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार माझा पुतण्या आहे. तो माझ्या मामाच्या मुलाचा मुलगा आहे. तो आला आणि त्याने माझ्या भावाच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर त्याला मारले. माझ्या मुलाने त्याच्या काकांच्या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही मारण्यात आले. अल्पवयीन आरोपीने आकाशकडून पैसे घेतले होते आणि ते परत मागितल्यावर त्याने आकाशच्या हत्येचा कट रचला," असा दावा योगेशने केला आहे.
तसेच पैशांच्या वादातूनच महिन्याभरापूर्वी अल्पवयीन आरोपीने स्वतःच्याच घरावर गोळीबार करुन आमच्यावर आरोप केले होते. ते प्रकरण मिटल्यानंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी आम्हाला फोन करुन पैसे द्या नाहीतर माझा मुलगा तुम्हाला मारेल आणि तो अल्पवयीन असल्याने लवकर सुटेल अशी धमकी दिली होती, असे योगेशने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, मृत आकाशने आरोपी अल्पवयीन मुलाला काही काम दिले होते, त्यासाठी त्याला ७० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. काम पूर्ण झाल्यानंतर आकाश ना पैसे देत होता ना आरोपीचा फोन उचलत होता. यामुळे अल्पवयीन चांगलाच संतापला होता. त्याने कॉन्ट्रॅक्ट किलर नेमला आणि दिवाळीच्या दिवशी संधी बघून आकाशचा खून केला.