नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि गजेंद्र सिंह शेखावत यांना अनुक्रमे राजस्थान आणि हरयाणाचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. भाजप आणि मित्र पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने दोन राज्यांत चुरशीची निवडणूक होणार आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. जी. किशन रेड्डी यांचीही कर्नाटकातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. रिक्त जागांपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवित असल्याने या दोन राज्यांतही अटीतटीची लढत होईल.
त्रिपुरा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रभारी....
भाजपने त्रिपुरा विधानसभेच्या चार जागांच्या पोटनिवडणुकीसाठीही प्रभारी नियुक्त केले आहेेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंघल आणि जयंत मल्ला बरूआ हे २३ जूनरोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार मोहिमेचे नेतृत्व करतील. बरूआ हे आसाम मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आहेत.