महाराष्ट्रातील सिंधुदूर्गमध्ये आठ महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुटल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना आता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या रस्त्याबाबत खळबळजनक माहिती येत आहे. बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱा रस्ता पुराच्या पाण्यात तुटून गेला आहे. यामुळे एका बाजुने वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाने सोडलेल्या डॅमच्या पाण्यामुळे हा रस्ता तुटून गेला आहे. हा रस्ता एवढ्या वाईटरित्या तुटला आहे की तो बनविण्यासाठी अनेक महिने लागू शकतात. पाऊस थांबल्यानंतरच हा रस्ता पुन्हा बनविण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना भारताचे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा २०१३ मध्ये शिलान्यास केला होता. २०१८ मध्ये हा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा राहिला होता. यासाठी 2989 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. गुजरातला या पुतळ्याच्या रुपात नवे पर्यटन स्थळ मिळाले आहे. तसेच स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.
गुजरातमधील 13 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे १८ जिल्ह्यांत पूरस्थिती आली आहे. 5 जिल्ह्यांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. राज्यात गेल्या 3 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.