इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीचा आनंदोत्सव एका क्षणात दु:खात बदलला. मंदिरातील एका विहिरीवरील छत अचानक कोसळून त्यावर उभे असलेले ३० भाविक ४० फूट खोल पाण्यात पडले. त्यातील १४ जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये १० महिलांचा समावेश आहे.
राष्ट्रपती द्राैपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनाग्रस्तांना शक्य ती सर्व मदत तातडीने करण्याचा आदेश शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला. हे मंदिर ६० वर्षे जुने आहे. छत काेळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या रक्षकांनी व नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. विहिरीतील पाण्याचा पंपांद्वारे उपसा करण्याचे कामही हाती घेण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
...म्हणून घडला अपघात
रामनवमीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविक आले होते. त्यातील काही भाविक या मंदिरातील विहिरीवर असलेल्या छतावर उभे होते. मात्र हे छत इतके वजन पेलू न शकल्याने कोसळले व ३० भाविक विहिरीत पडले. त्यामुळेच गोंधळ उडाला.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
विहिरीत कोसळून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले.
आंध्रच्या मंदिरातील मंडप जळून खाक
आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वेणुगोपाल मंदिरातील मंडपाला रामनवमीच्या दिवशी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये हा मंडप जळून खाक झाला व मंदिराच्या वास्तूचेही नुकसान झाले आहे. रामनवमीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी उसळली असतानाच ही घटना घडली. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी व मंदिरातून बाहेर पडण्याकरिता भाविकांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे मंदिरात काही वेळ विलक्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या आगीत प्राणहानी झालेली नाही.