निवडणुकांपूर्वीच वादंग; सचिन पायलट-गेहलोत यांचा वाद पुन्हा पेटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 09:34 AM2023-02-17T09:34:34+5:302023-02-17T09:34:57+5:30
लवकरच निर्णय घेण्याची मागणी
जयपूर : राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी न झालेल्या गेहलोत यांच्या गटातील नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी पायलट यांनी केली आहे.
राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा बदलायची असेल, तर राजस्थानमधील काँग्रेसशी संबंधित बाबींवर लवकर निर्णय घ्यावा लागेल,’ असे पायलट म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आक्रमकपणे प्रचार करत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसला आता मैदानात उतरावे लागेल, जेणेकरून आपण लढण्यासाठी सज्ज होऊ शकू.
२५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. ही बैठक होऊ शकली नाही. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनांचे पालन करण्यात आले नाही. सभा होऊ न देणे आणि समांतर सभा बोलावणे यासाठी जबाबदार असलेल्यांना अनुशासन भंगाच्या नोटिसा देण्यात आल्या. या नेत्यांनी नोटिसांना उत्तरे दिल्याचे मला माध्यमांतून कळले. - सचिन पायलट