आल्या संकटांना सामोरे जात, परिस्थितीशी दोनहात करत अनेकजण आपले शिक्षण पूर्ण करतात. नुकतेच १२ वीच्या जेईई आणि नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केलं. पण, गरिबीशी झुंजत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आई-वडिलांचीही मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरीही अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका कुंभाराच्या मुलीने वडिलांना कामात मदत करत, घरात वीट बनवत नीट तयारी केली. त्यामध्ये, दैदिप्यमान यशही मिळवलं.
यमुना चक्रधारी या विद्यार्थीनीने NEET परीक्षेत ७२० पैकी ५१६ गुण मिळवत ऑल इंडिया रँकींगमध्ये ९३,६८३ वा क्रमांक मिळवला आहे. तर, ओबीसी रँकींगमध्ये ४२,६८४ वा क्रमांक मिळवत हे यश संपादन केले. आता, या विद्यार्थीनीला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात निश्चित प्रवेश मिळेल. डॉक्टर झाल्यानंतर आपल्या गावातच प्रॅक्टीस करुन गरिबांची सेवा करायची, असा मानस यमुनाने व्यक्त केला आहे.
ज्या घरात कधी आईने पुस्तक पाहिलं नाही, वडिलांना इंग्रजीचं अक्षरही माहिती नाही. या कुटुंबातील दोन्ही मुलींनी जिल्ह्यात आई-वडिलांचं नाव काढलं. युक्ती आणि यमुना या दोघीहींनी अभ्यासातून स्वत:चं आणि कुटुंबाचं नाव झळकावलं. मोठी बहिण युक्ती हिने एम ए. इतिहास विषयात हेमचंद यादव विश्वविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला. तर, लहान बहिण यमुनाने यंदा नीट परीक्षा देत दैदिप्यमान यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे आई-वडिलांना मदत म्हणून दोन्ही मुली घरात वीट बनवण्याचं काम करतात. ज्या हातांनी मातीच्या विटा बनवल्या, तेच हात कागद आणि पेन हाती येताच नावलौकिक मिळवून गेले.
यमुनाला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते, त्यामुळे, ६ तास वीट बनवण्याचं काम केल्यानंतर ती आपल्या अभ्यासात लक्ष घालत होती. दररोज ४ ते ५ तास अभ्यास ती करायची. यमुनाच्या या मेहनतीचं आणि सातत्याचंच हे चीज आहे. यमुना आता डॉक्टर बनणार असून तिच्या मोठ्या बहिणीला प्रोफेसर बनायचं आहे.