नॉर्थ लखीमपूर (आसाम) : संपूर्ण देश दिल्लीतून चालविण्याचा भाजप व रा. स्व. संघाचा विचार आहे. मात्र, आमचा त्यास पाठिंबा नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील गोगामुख येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
आसामचा कारभार दिल्लीतून नाही, तर आसाममधूनच चालवला गेला पाहिजे. काँग्रेस सर्व राज्यांना समान मानते. ईशान्येकडील राज्य आणि तेथील लोकांची सुरक्षा आमच्यासाठी इतर राज्यांइतकीच महत्त्वाची आहे, असे राहुल म्हणाले, दरम्यान, भाजपला आदिवासींना जंगलाबाहेर येऊ द्यायचे नाही. तो त्यांना शिक्षण आणि इतर संधीपासून वंचित ठेवू इच्छित आहे, असा आरोपही राहुल यांनी आसाममधील माजुली येथील पहिल्या सभेत केला.
तृणमूलचा अद्याप निर्णय नाहीकोलकाता : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी आघाडी ‘इंडिया’मध्ये जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसने २५ जानेवारी रोजी राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत सामील होण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.