निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 06:42 PM2024-10-15T18:42:44+5:302024-10-15T18:43:48+5:30
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा केल्याने आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीत महायुतीविरुद्धमहाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या ५ वर्षात राज्यातील २ प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडली. त्यात अजित पवारांना राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाली तर शरद पवारांच्या गटाला तुतारी हे नवीन चिन्ह दिले. लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन पवारांनी १० पैकी ८ जागा जिंकल्या मात्र या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेत पवारांच्या गटाला फटका बसल्याचं दिसून आले.
लोकसभेतील गोंधळ पाहता शरद पवारांच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार गटाने २ विनंती केली होती, त्याची नोंद आयोगाने घेतली आहे. पहिला आक्षेप त्यांचे चिन्ह मतपत्रिकेवर छोटे दिसते ते योग्य नाही आणि दुसरा आक्षेप तुतारीसारखं दिसणारं दुसरे चिन्ह हटवावे अशी मागणी केली होती. आम्ही पहिली विनंती मान्य केली असून आम्ही त्यांच्याकडून आलेल्या आकाराचे चिन्ह मतपत्रिकेवर देणार आहोत. मात्र पिपाणी हे चिन्ह त्यांच्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे समान नाही असं त्यांनी शरद पवार गटाला कळवलं आहे.
लोकसभेला बसला होता फटका
शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह लोकसभेला मिळालं होते, तेव्हा पिपाणी चिन्हावरील अनेक उमेदवारांना पवारांनी लढवलेल्या मतदारसंघात लक्षणीय मतदान झाले होते. रावेरमध्ये पिपाणी चिन्हावरील उमेदवाराला ४३ हजार ९५७ मते, दिंडोरी इथं अपक्ष बाबू भगरे यांना १ लाख ३ हजार ६३२ मते, भिवंडीत पिपाणी चिन्हावरील उमेदवाराला २४ हजार ६२५ मते, बारामती इथं १४ हजार ९१७, शिरुरमध्ये २८ हजार ३२४ मते, अहमदनगरमध्ये ४४ हजार ९५७, बीडमध्ये ५४ हजार ८५० मते, साताऱ्यात ३७ हजार ६२ मते पिपाणी चिन्हावर पडली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह शरद पवारांच्या पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
महाराष्ट्रात असा असेल निवडणूक कार्यक्रम
महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २९ ऑक्टोबर हा असेल, तर ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.