नवी दिल्ली / इम्फाळ : मणिपूरमध्ये “अनिश्चितता आणि भीती” मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार तेथील “अत्यंत गंभीर” परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी आघाडीचे शिष्टमंडळ परतल्यानंतर केला. येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. ते त्यांच्या घरी कधी परततील हे त्यांना माहीत नाही. शेतीतील कामे ठप्प झाली आहेत.
सरकारी यंत्रणा पूर्णपणे अपयशी‘इंडिया’ आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी केंद्र सरकारच्या ‘मौना’बद्दल टीका केली. तसेच, ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल सरकार उदासीनता दर्शवित असल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांना दिलेल्या निवदेनात काय?मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत सतत गोळीबारामुळे हे निःसंशयपणे सिद्ध होते की राज्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या इंटरनेटवरील बंदीमुळे अफवा पसरल्या जात आहेत. सर्व समुदायांमध्ये संताप आणि परकेपणाची भावना आहे आणि विलंब न करता त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.
८९ दिवसांपासून मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून ती माहिती केंद्र सरकारला द्यावी, असे शिष्टमंडळाने म्हटले. १४० हून अधिक मृत्यू मणिपूरमध्ये आतापर्यंत झाले आहेत.५००० घरे जाळली गेली आहेत. ६० हजार लोक विस्थापित झाली आहेत.
शिष्टमंडळात काेण?या शिष्टमंडळात काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई, सुष्मिता देव, महुआ माझी, कनिमोळी, मोहम्मद फैजल, जयंत चौधरी, मनोज कुमार झा, एन. के. प्रेमचंद्रन, टी. तिरुमावलावन, डी. रविकुमार यांच्याशिवाय राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह आणि अनिल प्रसाद हेगडे, संदोश कुमार, ए. ए. रहीम, सपाचे जावेद अली खान, आययूएमएलचे ई. टी. मोहम्मद बशीर, आपचे सुशील गुप्ता आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांची उपस्थिती होती.