मध्य प्रदेशचे सर्वात गरीब आणि झोपडीत राहणाऱ्या आमदाराने अवघ्या दोनच महिन्यांत नवी कोरी इनोव्हा घेतली आहे. यामुळे ३०० किमींचे अंतर दुचाकीवरून पार करणारे कमलेश्वर डोडियार पुन्हा चर्चेत आले आहेत. या आमदाराने ३० लाखांची कार घेतली आहे.
सैलाना मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यावर कमलेश्वर डोडियार हे दुचाकीवरून विधानसभेत पोहोचले होते. आता कार घेतल्यावर लोक त्यांना कारवाले आमदार असे संबोधत आहेत. आमदारांचे घर पाहिले तर मातीच्या भिंती आहेत. कधी पडतील याचा नेम नाही. घरावर पत्रे घातलेले आहेत. दरवाजा ढकलला तरी पडेल अशी परिस्थिती आहे. अशा आमदाराने थेट ३० लाखांची श्रीमंतांची कार घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे ही कार त्यांनी कर्ज काढून घेतली आहे. सहा लाख रुपये त्यांनी डाऊनपेमेंट दिले आहे. तर २४ लाखांचे कर्ज काढले आहे. ६ लाख रुपये त्यांच्या मित्रांनी गोळा करून दिले आहेत. कार घेण्यामागे त्यांनी कारण दिले आहे. सैलाना मतदारसंघ ग्रामीण भागात येतो. यामुळे प्रत्येक ठिकाणी दुचाकीवरून जाणे शक्य नाहीय. यामुळे मला कारची गरज भासली, असे या आमदारांनी म्हटले आहे.
कमलेश्वर हे कायदा पदवीधर असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. या काळात त्यांनी दिल्लीत टिफिनचे वाटप करून आपला खर्च भागवला. कमलेश्वर 2013 पासून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवत आहेत पण 2023 मध्ये त्यांना यश मिळाले. त्यांना 71219 मते मिळाली. तर काँग्रेसचे हर्ष विजय गेहलोत यांना ६६६०१ मते मिळाली. ४६१८ मतांनी त्यांना विजय मिळाला आहे.