बंगळुरू - भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बुधवारी ९० उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत भाजपाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये, विद्यमान ५ खासदारांचं तिकीट कापलं असून बीडमधून पंकजा मुंडेंना संधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे कर्नाटकमध्येही २० उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपाने केली आहे. त्यामध्ये हावेरी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. त्यावरुन, आता वाद होत असून भाजपाच्या बड्या नेत्याने बंडखोरी करण्याचे संकेद दिले आहेत.
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपाने रणनिती आखायाला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपा कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. म्हणूनच, भाजपाने हरियाणातील पक्षासोबतची आघाडी तोडली असून तेथे नव्याने सरकार स्थापन केले. तसेच, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनाही लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. तर, कर्नाटकमध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि भाजापाचे वरिष्ठ नेते के.एस. ईश्वरप्पा यांचे सुपुत्र कांतेश यांना संधी न दिल्याने ईश्वरप्पा नाराज झाले आहेत. भाजपाच्या दुसऱ्या यादीत लेकाचं नाव नसल्याने वडिलांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेते बी.एस. येडीयुरप्पा यांनी वचन दिले होते की, हावेरी लोकसभा मतदारसंघातून कांतेश यांना उमेदवारी दिली जाईल. तर, कांतेश यांच्या प्रचारासाठी मी स्वत: मैदानात उतरले, असे ईश्वरप्पा यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. मात्र, भाजपाच्या दुसऱ्या यादीत हावेरी मतदारसंघातून बसवराज बोम्मई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, ईश्वरप्पा नाराज झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे.
१५ मार्च रोजी शिवमोगा येथे आपल्या कार्यकत्यांसोबत संवाद साधून ईश्वरप्पा पुढील निर्णय घेणार आहेत. मात्र, शिवमोग्गा किंवा हावेरी लोकसभा मतदारसंघातून ते आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी इच्छुक असल्यांचही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवमोग्गा हा मतदारसंघ येडीयुरप्पा यांच्या मुलाचा म्हणजेच बीवाई राघवेंद्र यांची पहिली पसंत आहे. तर, ते येथून विद्यमान खासदारही आहेत. मात्र, कार्यकर्ते काय म्हणतात, यावरुनच आपल्या मुलाच्या उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, असे ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गतवर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्येही कांतेश यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवमोग्गा विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळेही ईश्वरप्पा नाराज आहेत.