बंगळुरू : दक्षिण कर्नाटक म्हणजे जेडीएसचा पट्टा.. एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आपल्या मुलाच्या वरुणा मतदारसंघात उभे राहिले होते. मुलाचा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात सिद्धरामय्यांना यश आले आहे.
रामनगरच्या जागेकडे संपूर्ण कर्नाटकाचे लक्ष लागले होते. कारण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिलकुमार स्वामी हे रिंगणात होते. या मतदारसंघातून मागील निवडणुकीत निखिल कुमारस्वामी यांची आई अनिता कुमारस्वामी या विजयी झाल्या होत्या. यंदा ही जागा निखिल याने गमावली आहे.
डी. के. शिवकुमार ठरले किंगमेकरबंगळुरू जिल्ह्यातील कनकपूर मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार एक लाखाहून अधिक मते घेऊन किंगमेकर ठरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने विद्यमान गृहमंत्री आर. अशोक यांना उमेदवारी दिली होती; मात्र ते तिसऱ्या स्थानी राहिले. जेडीएस व भाजपच्या दोन्ही उमेदवारांना वीस हजारांच्या आतमध्ये मते मिळाली आहेत.
वडील-काका जिंकलेनिखिलकुमार स्वामी हे पराभूत झाले असले तरी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व काका एच. डी. रेवण्णा हे विजयी झाले आहेत. रेवण्णा हे आत्तापर्यंत सात वेळा निवडून आले आहेत; मात्र, निखिल कुमारस्वामी हे लोकसभेनंतर विधानसभेतही हरले.
मुलगा अन् वडील दोघेही विजयीम्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्वरी मतदारसंघातून जेडीएसचे जी.टी. देवेगौडा हे दुसऱ्यांदा विजयी झाले. मागील वेळेस त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हरविले होते. हनसूरमधून जी. टी. देवेगौडा यांचा मुलगा जी. डी. हरीश गौडा हे विजयी झाले आहेत. वडील व मुलगा दोघांनीही विधानसभेत प्रवेश केला आहे.