हरयाणामधील फरीदाबाद येथे लग्न लागत असताना जबरदस्तीने डीजे वाजवण्याच्या हट्टामुळे लग्नात विघ्न आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डीजे वाजवण्यावरून वधू आणि वर पक्षाची मंडळी एकमेकांशी भिडल्याने झालेल्या हाणामारीत दोन्हीकडचे दहा जण गंभीर जखमी झाले. यामधील आठ जण वधू पक्षाकडचे असल्याचे समोर येत आहे. ही घटना फरीदाबादमधील बल्लभगडमधील मलेरना रोड येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. आता जखमींवर वल्लभगडच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच वधू पक्षाने दिलेल्या तक्रारीवरून वर पक्षाकडच्या लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बल्लभगडमधील आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील मलेना रोडवर एक लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान, वरमाला घातल असताना काही काळासाठी डीजे बंद करण्यास सांगण्यात आले. त्यावरून मुलाकडची मंडळी भडकली. त्यांनी वधू पक्षाच्या लोकांवर हल्ला केला.
प्रत्युत्तरदाखल वधूपक्षाकडूनही वर पक्षाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. भांडण वाढत असल्याचे पाहून विवाह सोहळा थांबवण्यात आला. तसेच जखमींना उपचारांसाठी वल्लभगड येथील सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. लग्नास उपस्थित असलेल्या एकाने सांगितले की, त्यांनी वरमाला घालण्यापूर्वी काही काळासाठी डीजे बंद ठेवण्यास सांगितले होते. त्यावरून वर पक्षाचे लोक संतापले. त्यांनी जीवघेणा हल्ला केला.
त्यांनी पुढे सांगितले की, वऱ्हाड्यांना वरमाला घातल्यानंतर डीजे पुन्हा सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र वऱ्हाडी मंडळींनी मारहाण सुरू केली. त्यानंतर दोन्हीकडून हाणामारी सुरू झाली. यात वधूची आई आणि बहीणही जखमी झाली. त्यांनी आरोप केला की, वरात आल्यावर वर पक्षाने सोन्याची चेन आणि रोख रकमेचीही मागणी केली होती. मात्र या वादविवादानंतर आता दोन्हीकडून तडजोड झाली आहे. तसेच वधूपक्षाचा जो खर्च झाला तो वर पक्षाकडून घेण्यात येईल, असे ठरले.