सुनील चावके -
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून नव्या संसद भवनाच्या राष्ट्रार्पणाचा मुहूर्त काढण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत भाजपने या सोहळ्याला राष्ट्रवादाचा स्पिन दिला आहे.
सावरकर आणि संसद भवन यांचा संबंध वीस वर्षे जुना आहे. केंद्रात वाजपेयी सरकार असताना लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पुढाकाराने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकर यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला; पण या विरोधाला न जुमानता या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले होते.
राहुल गांधींनी केली होती टीका- भारत जोडो यात्रेदरम्यान आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. - सावरकर यांच्यावर टीका करून काही साध्य होणार नाही, असे शरद पवार यांनी समजावल्यानंतर तसेच उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी टीकेला विराम दिला होता. आता सावरकर यांच्या जयंतीच्या पर्वावर नव्या संसद भवनाचेच राष्ट्रार्पण होत असल्याचे सांगून भाजपने सावरकर विरोधकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.